Tuesday, October 6, 2015


पान नंबर १९ व २०
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 19
सत्गुरू आणि परमतत्वाचे केलेले विश्लेषण
    ह्यापुढे आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने "परम तत्व" लक्षांत येण्याकरता, आणखी एक उदाहरण येथे देत आहे, ज्याचा उल्लेख "श्रीगुरुदेव दत्त" स्तुती श्लोकांत, अनादि काळांत, खालीलप्रमाणे फार सुंदररीत्या केला गेला आहे, व समजून घ्यावयास निर्विवाद अतिउत्तमच आहे. तसे पाहिले तर, ह्या अगोदर ह्यांतल्या पहिल्या दोन ओळी व त्याचा अर्थ, दासने समजावला आहे, तरीही हरकत नाही, आपण परत येथे "सर्वव्यापक" अर्थ समजून घेऊ म्हणजे आपल्या मनी कोणताही किंतु किंवा परंतु असे शब्द (शंका) येणार नाहीत.

श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ||
ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सत्गुरू त्वं नमामि ||

    ह्या संपूर्ण श्लोकांत पहिला श्लोक व त्याची टीका तसेच विशद केलेला अर्थ देखील, आपण पान नं. १६ मध्ये सुरवातीलाच वाचला. आता पुढील दोन श्लोकांची वेगवेगळी टीका व त्यांचा एकत्र विशद अर्थ, आपण पाहुया.

ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
टीका:
ब्रह्मानंद देणारा, परमसुखदायक असा वाटणारा, अशी हि पावन गुरुज्ञानमूर्ती पाहून, मनी चलबिचल थांबविणारे, आकाशासारखे सर्वव्यापक प्रतीत होणारे, पाण्यांत राहूनही मासे लक्ष साधू शकत नाहीत, असे तत्व उलगडून दाखविणारे असे माझे गुरु.


एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||
टीका:
एकसारखी, निर्लेप असून अढळ, सर्वभूतांना साक्षी असून, भाव नसणारे, तिन्ही गुण नसणारे, अशा सत्गुरुला माझा प्रणाम असो.


दोन्ही श्लोकांचा एकत्र विशद:
ज्यांना पाहून ब्रह्मानंदाचा व परमसुखाचा लाभ निश्चित होतो, असे माझे पावन श्रद्धास्थान, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, जलाशयांत राहून माशाला ज्याप्रमाणे, त्याला त्याचे जीवनाचे तत्व कळत नाही, त्याप्रमाणे सर्वदूर पसरलेले, आभाळासमान असणारे, असे परमेश्वरीय तत्व, असे ज्ञान कि जे मनांत द्वंद्व (हलकल्लोळ) उडवते, न बदलणारे, कुठलेही आच्छादन न ठेवता, निर्लेप असणारे, अढळ राहून, सर्व भूत, वर्तमान व भविष्य काळाला साक्षी असणारे, सर्व भावांच्या पलीकडे असलेले, सत, रज आणि तम ह्या तीनही गुणांवर स्वामित्व राखून, हे गुण न बाळगणारे, अशा ईश्वरीय तत्वाचे अनुसंधान करून, त्याची कृपा करवून देणारे, त्याचे ज्ञान विवेचन करून निरुपण करणारे व समजावणारे, अशा माझ्या सत्गुरुला माझे कायम नमन (प्रणाम) आहे.


    मुख्यत्वे आपण आता माशाचे उदाहरण, जे कलियुगाच्या प्रारंभिक कालांतच दिले गेले, ते उत्तम तऱ्हेने विशद केलेलेही पाहिले. माशाला पाण्यांत राहूनदेखील त्याला जसे त्याच्या जीवनाचे तत्व कळत नाही, पण जेव्हा कोणीतरी त्या माशाला जर पाण्याबाहेर काढले, तर मात्र लगेच निमिषमात्र वेळांत, त्या माशाला, त्याच्या जीवनतत्वापासून बाहेर (लांब) आल्याची जाणीव होते, व तो मासा तडफडू लागतो, हवा असून श्वास घेऊ शकत नाही, व थोडे अधिक वेळ पाण्याबाहेर राहिला तर त्याचा मृत्यू होतो. ह्याचाच अर्थ त्या माशाला पाण्याबाहेर आल्यानंतर, त्याच्याकरता अनन्य व असाधारण असे, त्या "पाणी" ह्या तत्वाचे महत्व कळले, परंतु नंतर कळून त्याचा काय उपयोग? नाही का?
    काय तुम्हाला असे नाही वाटत? जेव्हा आपल्याला गती प्राप्त होण्याची वेळ येईल, ईश्वराकडे परत जाण्याची वेळ येईल, त्यावेळेस नेमकी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल? आपली देखील अशीच तडफड होईल, कारण आपल्याला देखील आपले खरे तत्व म्हणजे जे ईश्वरीय परमतत्व नेमके काय आहे? कुठे आहे? त्याची व आपली काय सांगड आहे? माहित नसेल, तर काय होईल? निश्चितच आपणही भरकटणार, ह्यांत काहीच शंका नाही. ज्याअर्थी असे होते, त्याअर्थी असेही होते, आपण आपल्या "निजस्वरुपांत," म्हणजेच "ईश्वरीय परमतत्वांत" सामील होणार नाही, म्हणजेच आपला आत्मा हा "अशांत" रहाणार. म्हणजेच ह्याचा अर्थ असाही होईल, कि एव्हढा "मौलिक मानव देह" परमेश्वराने आपल्याला देऊन देखील व आपल्याला लाभून देखील, आपण त्याची, त्या परमतत्वाची माहिती करून घेतली नाही, त्याची भक्ती केली नाही, म्हणजेच ह्या पूर्ण आयुष्याची मात्र निव्वळ मातीच केली. आता ह्याशिवाय दुसरा काही अर्थ निघतो का? आपणच सांगावे.


Pg 20

    ह्याकरतांच परमेश्वर आपल्याला वारंवार आगाह (जाणीव) देतो, कि हे मानवा, तुला मी, तुझ्या आत्म्याचे सार्थक करून घेण्याकरता तुला सर्वोत्तम असा मानव देह दिला, सर्वोत्तम अशी बुद्धी दिली, तुझ्याकरता वेद, पुराण, बायबल, कुराण अशा धार्मिक तसेच मानवता शिकवणारे ग्रंथ लिहिले, तुझ्याकरता ह्या सर्व सृष्टीची रचना केली, संपूर्ण निसर्ग तुझ्या हवाली केला, तुला जे काही पाहिजे ते घेण्यासाठी तुला हात व पाय दिले, विचार करण्यांस बुद्धी दिली, काय खावे, काय प्यावे, काय नेसावे हे ठरवायचे स्वातंत्र्य दिले, तुला जी माझे निव्वळ प्रतिस्वरूप, अशी दया, करुणा, ममत्व ह्या अशा भावनांनी युक्त आई दिली, तुला तुझ्या पालन पोषणार्थ काळजी घेतील असे वडील दिले. जेणेकरून तू खुश रहावास, व तुझ्या भक्तीमार्गांत तुला काहीही अडचण येऊ नये ह्याची व्यवस्था केली. असेही नाही कि, सदा सर्व काळ माझी भक्तीच कर, म्हणून सांगितले, तर भगवत गीता मध्ये लिहून ठेवले, कि तू तुझे कर्तव्य व कर्म करत करतच माझी भक्ती कर, तसेच असेही उधृत केले कि कर्मयोग हा अत्युच्च असा भक्तीयोग (भक्तिमार्ग) मी मानतो, व अशीच केलेली भक्ती मला पोचते व पावते.
    तुझ्या कल्याणार्थ सत्गुरू व संत निर्माण केले, व त्यांनी मानवकल्याणार्थ अनेकप्रकारे, अनेक भाषांमध्ये भक्तीसाहित्याची निर्मिती केली, तसेच उपदेशही केले. परंतु हे मानवा, ज्याप्रमाणे लहान बालक, त्याला दिलेल्या एखाद्या किंवा अनेक आकर्षक खेळण्यांमध्ये रमते, त्याला खाण्यापिण्याची देखील शुद्ध रहांत नाही, त्याप्रमाणे तू मात्र तुझ्यासाठी, तुझ्या पालन व उपयोगासाठी मी निर्माण केलेल्या अनेक क्षणभंगुर तसेच नाशिवंत गोष्टींच्या लालसा व आकर्षणात अडकून त्याचा संचय करण्याची आकांक्षा बाळगून, राक्षसी वृत्ती जोपासलीस, व मानवतेला झिडकारलेस, तर त्यांत माझी काय चूक आहे? हि चूक तुझी स्वतःचीच असणार आहे. तुला मी रिकाम्या हाताने पृथ्वीवर पाठवले, तसेच परतीला तू रिकाम्या हातानेच परत यायचे आहेस, हे कायम माहीत असतांना सुद्धा त्याच आकर्षणांत अडकून पडलास. परंतु नेहेमी प्रत्येक मानवाला जन्मांस घालतांना, असाच मानव जन्मांचा अर्थ गृहीत धरला, कि प्रत्येक मानव, पृथ्विलोकी जन्म पावल्यावर, आपल्या आत्म्याचे व ईश्वराचे निजस्वरूप जाणून, ईश्वराची प्रार्थना व त्याची भक्ती करून, आपला उद्धार करून, ज्ञानी होऊन, परमेश्वराच्या "परमतत्व" असे निजरुपांत, सम्मिलित होईल, म्हणजेच मोक्ष पावू शकेल अशी मी रचना केली.
    री हे मानवा आतातरी वेळ न घालवता शक्य तेव्हढ्या लवकर, ह्या निव्वळ मोहमयी मायेतून सूट, आपली वृत्ती समाधानी ठेवून, आपले ध्यान सन्मार्ग व भक्तीकडे लाव. त्यातच तुझे, तुझ्या मातापित्याचे, तुझ्या कुटुंबाचे कायम कल्याण होणार आहे, ह्यावर विश्वास ठेव. व कायम विश्वास ठेवून रहा. तुमच्या चंचल मनाला, तुम्ही संतांच्या समवेत लावलेत तर तुम्हाला काहीही कधीही कधीच अडचण येणार नाही, व आलीच तर त्या अडचणी बाबत संतांना सांगा, व त्यांना त्याचे निवारण करायला सांगा, काळजी करू नका, ईश्वर ते निवारण करण्यास समर्थ आहे, कारण ईश्वर मातापित्यांचे पायी व संतांच्याच ठायींच सापडतो, अन्यत्र कुठेही ईश्वर सापडणे कायम अशक्यच असते.
    प्रिय वाचकहो, आतापर्यंत लिहिलेले वाचून, विनाकारण काळजी करू नका, घाबरू देखील नका, कारण आपण इथपर्यंत जे लिहिले आहे ते संपूर्ण वाचत आलांत, ह्याचाच अर्थ असा होतो, कि आपल्याला परमेश्वराचे ज्ञान (ओळख) करून, त्याची भक्ती करणे आवश्यक असल्याचे पूर्णपणाने कळले आहे. ह्या अगोदरच्या पानी व ह्या पानांवर लिहिलेले जर आपल्याला व्यवस्थित कळले असेल व आपल्या मानव जीवनाचे मर्म म्हणजे ईश्वराला प्राप्त करणे आहे. इथपर्यंत जर आपण मनांशी ठाम झाला असाल, तर निश्चितच समजू घ्या, कि तुमची, आपली स्वतःची परमेश्वराकरता भक्ती, जेव्हापासून तुम्ही मेणबत्तीचे उदाहरण वाचावयांस सुरवांत केलीत, तेव्हापासूनच सुरवांत झाली आहे. तसेच आणखी यापुढे जसजसे तुम्ही पुढे वाचत जाल, तसतसे तुम्हाला ईश्वरीय सानिध्य कसे प्राप्त करावे ते सोपे करत आहे. त्याकरता कुठलाही तुमच्या ध्यानी येईल असा, पण ईश्वरीय श्लोक किंवा मंत्र, जर काहीच सापडत किंवा समजत नसेल तर, प्रत्येक पानी हेडिंगला "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" || हा मंत्र, सकाळी स्नानानंतर व रात्री झोपायच्या अगोदर, १०८ वेळा म्हणत चला. आस्ते आस्ते, लवकरांत लवकर, आपणाला अनुभूतींची प्राप्ती होण्यांस सुरवांत होईल. येथे आपल्या मनांत येईल कि दासने कुठलाही पण ईश्वराचा श्लोक किंवा मंत्र, असे का लिहिले व म्हटले? कारण अत्यंत साधे आहे, ईश्वराला तुमची त्याच्याबद्दल असलेली आंतरिक ओढ, तुमची आस्था ताबडतोब कळते. त्याला तुम्ही कोणत्याही नावाने आवाज द्या, मग तुम्ही कुठल्याही भाषेत त्याला तुमचा आवाज द्या, तसेच तुम्ही, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही संप्रदायाचे, किंवा काळे वा गोरे असा, ईश्वर तो विचार कधीच करत नाही, कि करणारही नाही, कारण सर्व सजीव, निर्जीव व निसर्ग, त्यानेच निर्मिलेले आहेत. तुमची कर्म, तुमची आस्था जर स्वच्छ असतील तर, तुमची हाक ईश्वर ऐकतोच ऐकतो. ईश्वराला तुमचे ध्यान, तुमची प्रेरणा, तुम्ही केलेली तुमच्या मातापित्याची सेवा, मानवतेची सेवा, व त्याला ओळखून, त्याचे नुसते नामस्मरण पाहिजे आहे. ध्यानांत ठेवा, ईश्वराला तुमचा हार नको, नारळ नको, गंध व अक्षता नको, तुमच्या मिष्टान्न (प्रसाद) नको, तर त्याला तुमच्या मनाच्या समर्पणाची व मानवतेकरता तसेच त्याने निर्मिलेल्या निसर्गाच्या जपणुकीची आवश्यकता आहे. म्हणजेच ज्याचा स्वामी स्वयं परमेश्वर आहे, त्याला तेच काय देऊ करता? त्याला तर तुमच्या, इतरांप्रती असलेली दया, करुणा, सेवाभाव व ईश्वराचे नामस्मरण एव्हढेच हवे आहे. आणि १००% खात्री बाळगा, जसजसे आपण ह्यावर चालू लागाल, तसतसे आपण एक वेगळीच व्यक्ती म्हणून समाजांत स्थान प्राप्त कराल व ईश्वराच्या चरणी, आपली सेवा रजू होण्यास सुरवात होईल.
    थपर्यंत आल्यानंतर, साहजिकच माझे निस्सीम वाचकहो, आपणा सर्वांना सत्गुरू म्हणजे काय? तो कसा असतो? त्याची लक्षणे काय? त्याला कसा ओळखावा? हे प्रश्न मनांत खळबळ माजवत असतील. कारण दासला अंदाज आहे कि कितीही समजावून परमेश्वराबद्दल सांगितले, तरी त्या परमेश्वराचे अस्तित्व तसेच ओळख देण्यांस शब्द कमीच पडतांत. विचार करा, चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराण त्याचबरोबर अनेक संतांनी, अनेकविध मार्गांनी शब्दांनी सांगण्याचा तसेच शब्दांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही, कारण त्यासाठी शब्दच अपुरे पडतांत, तर समजून घ्या दासाचे शब्द किती पुरे पडतील? तरीही साध्या शब्दांनी, सहज रीतीने व सोप्या उदाहरणाने समजावून घेऊन, आपण खूपच ईश्वराच्या जवळ आलो आहोत तसेच आपल्याला ईश्वरापर्यंत पोचण्याकरता सत्गुरुची आवश्यकता भासते. म्हणूनच सत्गुरुंचे महत्व अनन्य व असामान्य आहे, म्हणून त्याकरता सत्गुरुला कसे प्राप्त करावे, हेही आपण पुढच्या पानी लक्षांत घेऊया..

पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानांत, प्रिय वाचकहो, आपण सर्वांकरता, सत्गुरुची ओळख, त्याचे वर्तन, त्याचे वर्णन कसे असते, ह्याबद्दल आपणांस माहिती करून दिली जाइल.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

No comments:

Post a Comment